
भंडारा पत्रिका/रमाकांत खोब्रागडे तिरोडा : जवळपास तीन वर्षे आधी प्रशासक राज असताना तिरोडा शहरात एक कोटी रुपये निधीतून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली. मात्र यातील काही सीसीटीव्ही दोन महिन्यातच बंद पडल्याने तसेच काही काळात इतरही अनेक भागातील बंद पडलेले कॅमेरे सुरू करण्याकरता व नगरपरिषद निवडणुकीत होणारे गैरप्रकार उघडकीस आणण्याकरता आवश्यक असतानाही ही बंद पडलेली यंत्रणा योग्य प्रकारे सुरू करण्यास कंत्राटदार कंपनी किंवा प्रशासनातर्फे कुठलीही कार्यवाही करण्यात न आल्यामुळे शासनाचा कोट्यावधीचे निधीचा दुरुपयोग झाल्याची शंका तिरोडावासी व्यक्त करीत आहेत.
सर्वत्र होत असलेले अपघात, दुर्घटना, चोरी, महीलां संबंधित वा इतर घटनांवर लक्ष ठेवून किंवा घडलेल्या घटनांचा उलगडा व्हावा म्हणून शासनाकडून तिरोडा नगर परिषदेला मिळालेल्या एक कोटी रुपयाचे निधीतून तीन वर्षे आधी नागपूर येथील एका कंपनीस तिरोडा शहरात सीसीटीव्ही यंत्रणा लावण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते व या कंपनीतर्फे करार पत्रानुसार ११२ कॅमेरे बसवणे अपेक्षित असताना तिरोडा कवलेवाडा मार्गावर रेल्वे उडान पुलाचे काम सुरू असल्याने फक्त ८७ कॅमेरे बसवून कार्यान्वित करण्यात आले होते. मात्र जवळपास दोन महिन्यातच सुकळी नाका युनियन बँक व चंद्रभागा नाका येथे सीसीटीव्ही बसवलेले पोलला ट्रकने धडक दिल्याने या पोलवरील सीसीटीव्ही खराब झाल्याने करारानुसार संबंधित कंपनीने दोन वर्ष मुदतीत देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे असल्याने हे सीसीटीव्ही दुरुस्त करणे तसेच काही काळा नंतर इतरही भागातील सीसीटीव्ही बंद पडून केवळ ३०-३२ कॅमेरेच सुरू असल्याने या कॅमेºयांचे बॅकअपही मिळत नसल्याने तिरोडा पोलिसांना शहरात होणारे अपघात, चोरी, टवाळखोर व इतर गुन्हे शोधण्यास अडचण निर्माण होत असल्याने तसेच शहरातील सीसीटीव्ही बंद असल्याचे माहितीमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढून शहरात चोरी व इतर गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांनी अनेकदा नगरपरिषदेला बंद असलेले सीसीटीव्ही सुरू करावी म्हणून पत्रे देऊनही त्याचप्रमाणे नोव्हेंबर डिसेंबर २०२५ मध्ये तिरोडा नगर परिषदेच्या निवडणुका असल्याने या निवडणुकीदरम्यान होणारे गैरप्रकारावर लक्ष ठेवून गैरप्रकार झाल्यास कार्यवाही करण्यास सीसीटीव्ही यंत्रणेची मदत घेता आली असती मात्र याही काळात प्रशासक राज असतानाही ही संपूर्ण यंत्रणा दुरुस्त करण्यात आली नसल्याने जवळपास पंधरा दिवसा आधीपर्यंत केवळ ३० ३२ कॅमेरे सुरू होते.
मात्र कंपनीची नगर परिषदेकडे असलेली अनामत रक्कम परत मिळावी म्हणून या पंधरा दिवसात कंपनीतर्फे दहा-बारा कॅमेरे दुरुस्त करण्यात आल्याने जवळपास ४२ सीसीटीव्ही कॅमेरे आजमीतीस सुरू असले तरी सुमारे अर्धे कॅमेरे बंदच असल्याने शासनाचा एक कोटी निधीचा गैरवापर झाल्याची शंका तिरोडावासी व्यक्त करीत आहेत. सध्यातरी ही सीसीटीव्ही यंत्रणा शोभेची वस्तू ठरत असल्याचे शहरवासी यांचे म्हणणे असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शहरातील पूर्ण सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत असून याबाबत तिरोडा नगर परिषदेचे नगर अभियंता अखिलेश सोनटक्के यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले नुसार सध्या विधानपरिषद निवडणुकांची आचारसंहिता असल्याने या निवडणुकीनंतरच याबाबत कारवाई करणे शक्य होईल असे सांगितले आहे.