
भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेला तब्बल ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी महिलेने दिनांक २५ मे २०२६ रोजी सकाळी घराची साफसफाई करत असताना घरातील अलमारीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. अलमारीतील थैली डायनिंग टेबलजवळ पडलेली दिसून आल्याने त्यांनी घरात शोध घेतला तसेच कुटुंबीयांकडे चौकशी केली. मात्र दागिन्यांबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने अज्ञात आरोपींनी घरात प्रवेश करून चोरी केल्याची तक्रार गोबरवाही पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये अंदाजे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, कानातील झुमके, सोन्याचे मणी असलेली एकदाणी, ओम लॉकेट असलेली चैन तसेच अन्य सोन्याची चैन असा एकूण ५८ ग्रॅम सोन्याचा ऐवज होता. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत सुमारे ५ लाख ७० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी अप.क्र. २७५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी अभिषेक उर्फ चांडरी दिगांबर मंडये (वय २४) व विधान प्रदीप पटले (वय २२, दोघेही रा. गोबरवाही) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून मेमोरँडम पंचनाम्यानुसार चोरीतील मुद्देमाल जप्त केला.
विशेष म्हणजे, आरोपींनी पोलीस स्टेशन गोबरवाही परिसरात मार्च २०२६ मध्ये तसेच सिहोरा परिसरात एप्रिल २०२६ मध्येही चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गित्ते तसेच पोलीस कर्मचारी पेंदाम, गायधने, शेळके, गभने यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गित्ते व त्यांच्या पथकाकडून सुरू आहे.