महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ग्राहकांची आर्थिक फसवणूक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या गोरेगाव शाखेतील बँक प्रतिनिधीमार्फत ग्राहकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकाराने बँकेच्या खातेदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी संबंधित ग्राहकांकडून शाखा व्यवस्थापकांकडे मौखिक तसेच लेखी तक्रारी करण्यात आलेल्या आहे. दरम्यान, बँक प्रशासनानेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी सुरू केली आहे. डेव्हीड नान्हे असे त्या बँक प्रतिनिधीचे नाव सांगण्यात येत असून लाखो रुपयांचा अपहार झाल्याची शंका ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे. गोरेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत सुमारे १५ हजार खातेदार आहेत. यामध्ये निराधार लाभार्थी, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यांचा समावेश आहे.

दररोज लाखो रुपयांचे व्यवहार या शाखेत होत असताना बँकेचे कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी कमिशन तत्वावर डेव्हीड नान्हे याची बँक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्याने पदाचा गैरवापर करून ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप ग्राहकांचा असून अनेक ग्राहकांनी बँकेत जमा करण्यासाठी दिलेली रक्कम नान्हे यांनी खात्यात जमाच केली नसल्याचे काही खातेदारांनी बँक पासबुक अद्ययावत केल्यानंतर आढळून आले आहे. विशेष म्हणजे महिला बचत गटांसह अनेक खातेदारांच्या रकमाही खात्यात जमा न झाल्याची बाब शुक्रवारी १९ जून रोजी समोर आली असून लाखो रुपयांच्या अफरातफरीचा संशय व्यक्त केला जात आहे. तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच ग्राहकांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करून न्याय द्यावा, अशी मागणी खातेदारांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणामुळे गोरेगाव परिसरात खळबळ उडाली असून खातेदारांकडून बँकेकडे धाव घेत खात्याच्या तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे बँकेत खातेदारांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, बँकिंग व्यवस्थेवरील विश्वासाला तडा देणाºया या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

चौकशी सुरू आहे, कारवाई करण्यात येईल…

या संदर्भात काही खातेदारांकडून मौखिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राथमिक चौकशीत काही सत्यता आढळून आली असल्याने संबंधित प्रतिनिधीला कामावरून कमी करण्यात आले आहे. शुक्रवारी १९ जून रोजी दोन लेखी तक्रारी प्राप्त झाल्या असून वरीष्ठांकडे पाठविण्यात आलेल्या आहे. तरी ज्या ग्राहकांची अशी फसवणूक झाली असेल किंवा ज्यांना शंका असेल त्यांनी २० जून रोजी बँकेत येऊन सहनिशा करावी व तशी तक्रार द्यावी. चौकशीअंती कारवाई करण्यात येईल.

– डी. पी. कांबडे, शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, गोरेगाव

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *