तिरोडा : मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याच्या वाराशिवनी तालुक्यातील किन्ही नवेगाव येथील वर्षा धुरणलाल तुरकर (३५) या महिलेची तिरोडा तालुक्यातील अर्जुनी-बोंडराणी परिसरात चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास श्रीराम मंदिराजवळ घडली. वर्षा या पुणे येथे एअर इंडिया कंपनीत लाईन आॅपरेटर म्हणून कार्यरत होत्या. त्या नुकत्याच माहेरी आल्या होत्या.
घटनेच्या दिवशी त्या आपली तीन वर्षांची मुलगी आईकडे ठेवून परिचित नितेश नरेश अग्रवाल (४१, रा. गोंदिया) यांच्यासोबत बोंडराणी परिसरात बोलत उभ्या होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून नितेश यांना लुटले आणि वर्षा यांच्यावर चाकूने वार करून घटनास्थळावरून पळ काढला. जखमी वर्षा यांना नातेवाइकांनी मध्यप्रदेशातील खैरलांजी येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळ दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ज्ञ, श्वानपथक, फॉरेन्सिक टीम आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. तोंडाला रुमाल बांधून व दुचाकीचा क्रमांक झाकून तीन संशयित परिसरात फिरत असल्याचे काही नागरिकांनी पाहिल्याची माहिती आहे.
