भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : ‘तू आजकाल खूप उडत आहेस, मी तुमसरचा डॉन आहे. माज्यावर खून आणि खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. माझे कोणी काही बिघडवू शकत नाही. आज तुला संपवतो, तुला माज्यापासून कोण वाचवतो तेच पाहतो,’ अशी धमकी देत एका इसमाने दुचाकीस्वारावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोन्ही हात व पाठीवरही मार लागला आहे. पतीला मारहाण होत असल्याचे पाहून मध्यस्थी करण्यासाठी धावलेल्या पत्नीवरही आरोपीने लोखंडी रॉडने हल्ला केला.
ही घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास तुमसर शहरातील गौतम वार्डात घडली. या प्रकरणातील फिर्यादी सतीश दामाजी नागोसे (४०, रा. कुंभारे वार्ड, तुमसर) हे आपल्या अॅक्टिव्हा दुचाकीने (क्र. एमएच ३६ एजे ५९७३) सिमेंट खरेदी करण्यासाठी तुमसर बाजारपेठेकडे जात होते. दरम्यान, गौतम वार्डातील छोटू समरीत यांच्या किराणा दुकानासमोर आरोपी मनोज कान्हेकर (४२, रा. कुंभारे वार्ड, तुमसर) याने त्यांना अडविले. आरोपीने फिर्यादीला उद्देशून उद्धट भाषेत बोलत स्वत:ला तुमसरचा डॉन असल्याचे सांगितले. आपल्यावर खून व खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल असून आपले कोणीही काही बिघडवू शकत नसल्याची दहशत निर्माण केली. त्यानंतर ‘आज तुला संपवतो, माज्यापासून तुला कोण वाचवतो ते पाहतो,’ अशी धमकी देत जवळील लोखंडी रॉडने सतीश नागोसे यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या वारामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. एवढ्यावरच न थांबता आरोपीने त्यांच्या दोन्ही हातांवर आणि पाठीवरही लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यामुळे हात व पाठीवर मुका मार लागून सूज आली.
दरम्यान, पतीवर हल्ला होत असल्याचे पाहून त्यांची पत्नी कल्पना नागोसे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांनाही सोडले नाही. लोखंडी रॉडने त्यांच्या डाव्या कमरेच्या खाली मारल्याने त्यांनाही दुखापत झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करून गंभीर जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादीच्या तोंडी तक्रारीसह वैद्यकीय अहवालाच्या आधारे तुमसर पोलिसांनी आरोपी मनोज कान्हेकर याच्याविरुद्ध अप.क्र. ११२३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११५(२) आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडेस्वार करीत आहेत. भरदिवसा शहरातील वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
